वर्धेच्या सूतिकागृहाची स्थापना १५ फेब्रुवारी १९३७ रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर झाली. ही संस्था स्थापन करण्यामध्ये आदरणीय कमलताई होस्पेट, कृष्णाताई भावे, वेणूताई लेले आणि सावित्रीबाई मातंगे यांचे योगदान होते. या संस्थेला सौ. रमाबाई कावळे, दुर्गाताई आगाशे, डॉ. शांताताई बापट, सौ. वनिताताई चोरघडे आणि डॉ. शशीताई जोशी यांनी मोलाची मदत केली. कै. लक्ष्मणराव अत्रे यांनी स्वतःची जमीन व रोख मिळवून संस्थेला मदत केली. श्री. तनखीवाले तसेच आ. जानकीदेवी बजाज यांनी आर्थिक मदत करून संस्थेचा पाया पक्का केला.
संस्थेच्या कार्याला १९३७ पासून प्रारंभ झाला. सन २००९ पासून श्रीमती पुष्पमाला देशमुख या संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने कार्य करत आहेत. या संसथेत कर्मचारी वसतीगृह, विद्यार्थिनींचे वसतीगृह, योगासनं, जिम यांचे वर्ग, फिजिओथेरपि, रंजन सभागृह, खादी उद्योग, मोबाईल मेडिकल युनिट व वृद्धाश्रम या प्रवृत्ती सुरु आहेत. मोबाईल मेडिकल युनिट द्वारे वर्धा जिल्ह्यातील ४७ दुर्गम गावांमध्ये औषदोपचार केला जातो. वृद्धाश्रमात आज ३५ वृद्ध आहेत. त्यान्ची देखभाल मातृ सेवा संघाद्वारे केली जाते. वृद्धांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे सावंगी तसेच केइएम हॉस्पिटल वर्धा या संस्थेची मोलाची मदत होते.
पुष्पमाला ताई देशमुख यांनी वृद्धांसाठी अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. १८० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ६० वृद्धांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सेवाग्राम हॉस्पिटलने निशुल्क करून दिली. या सोबत नाक, कान, घसा, कॅन्सर, तसेच दंतरोग तपासणी यांची शिबिरे वेळोवेळी वृद्धाश्रमात आयोजित केली जातात.
मोबाईल मेडिकल युनिट
मोबाईल मेडिकल युनिट द्वारे वर्धा जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, समुद्रपूर, हिंगणघाट आणि सेलू तालुक्यातील ४५ दुर्गम गावांमध्ये उपचार करण्यात येतो. गरोदर माता आणि बालके तसेच अबाल वृद्धांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधे दिली जातात. कुपोषित स्त्रिया व मुलांची माहिती सरकारला पाठवली जाते.
रंजन सभागृह
मातृ सेवा संघात रंजन सभागृह उभारलेले आहे. यात नाटक, सभा, लग्न असे कार्यक्रम पार पाडले जातात. हे सभागृह मध्यवर्ती असून येथे २४ तास पाण्याची सोय आहे.
खादी विभाग
मातृ सेवा परित्यक्त्या, विधवा स्त्रियांसाठी व ज्यांना लहान मुले आहेत अशा तरुण मुलींसाठी खादीचा उपक्रम चालवितात. यात सूत करणाऱ्या भगिनी त्यांच्या वेळेनुसार येतात व आपली सेवा देतात. येथे शिलाई, धुलाई, व विक्री सुद्धा केली जाते.
दवाखाना
मातृ सेवा संघात सूतिकागृह आहे. इथे वातानुकूलित शल्यगृह व प्रसूतिगृह असून प्रशस्त खोल्या व डॉरमेन्टेरी आहे. सद्यस्तिथीत कोरोनामुळे ही सेवा बंद झालेली आहे. आमच्या संस्थेला सेवाभावी डॉक्टरांची आवश्यकता आहे. आपल्या उदार सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. या संस्थेला आर्थिक मदत करून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.